उप-२७. 🌻 तुकाराम महाराज म्हणतात हे नरा, हे मनुष्या आता तरी तू श्री हरिच्या रंगात रंगून जा, त्याच्याशी समरस हो... 


म्हणजे तुला जर येथे कोणाच्या रंगात मिसळायचेच असेल, कोणाशी कायावाचामने एकरूप व्हायचेच असेल तर तू श्री हरिच्या रंगात मिसळ, त्याच्याशीच एकरूप हो, परंतु ह्या संसाराला व्यर्थ भुलू नकोस... 


ते म्हणतात हा संसार सर्वथा खोटा आहे हे ठाऊक असतानाही तू पतंगाप्रमाणे येथील नाशिवंत फुलांच्या रंगात का मिसळतो आहेस? ह्या मायारूपी संसाराला का भुलतो आहेस?... 


ते म्हणतात हे शरीर, हा देह जाणारा असून तो तुला कधीही दगा देऊन जाऊ शकतो, कधीही तुझी साथ सोडू शकतो, त्यामुळे त्याच्या जोरावर तू सतत ज्या वेगाने अभिलाषा धरतो आहेस ते करणे सोडून दे...


कारण त्या बळावर तू येथे जे काही जोडत आहेस ते देखील सर्व नाशिवंत असून नाश पावणारे आहे, तुझा हा जो काही परिवार आहे, द्रव्य-दारा, धनसंपत्ती आहे, तुझी बायकापोरे आहेत हे सर्व देखील क्षणभंगुर असून केव्हाना केव्हा जाणारे आहे, त्यामुळे यापुढे तरी व्यर्थ त्यावर विसंबून राहून नकोस...


तुकोबाराय शेवटी म्हणतात हे मनुष्या एक गोष्ट लक्षात घे, आपण जिवंत असताना जो कोणी आपला खऱ्या अर्थाने सखा असतो आणि मुख्य म्हणजे अंतकाळी देखील आपल्याला जो साथ करतो, अन्य संसारिक नातेवाईकांप्रमाणे जो आपल्याला सोडून जात नाही, म्हणजे असा जो कोणी आपला खरा सगा सोयरा असतो तो एक श्री हरिच असून तू आता त्याचीच कास धर, त्याचाच हात पकड, त्याचेच नाम कंठी धारण कर आणि त्यालाच सदैव चित्तात स्थान दे, मग बघ कसा तुझा उद्धार होते ते..


🌻🌿🌻🌿


रंगी रंगे रे श्रीरंगें । काय भुललासी पतंगे ।।


शरीर जायाचे ठेवणे । धरिसी अभिलाष झणे ।।


नव्हे तुझा हा परिवार । द्रव्यदारा क्षणभंगुर ।।


अंतकाळीचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ।।


🌻🌿🌻🌿


अभंग १५३६


क्रमशः

Comments

Popular posts from this blog