उप-२६.🌻 तुकाराम महाराज म्हणतात हे नरा, हे मनुष्या कित्येक जन्मां अंती तू आता मानव योनीत जन्मला आहेस, कोण जाणे किती योनीतुन फिरून आल्यावर तुला हा नरदेंह लाभला आहे...


त्यामुळे यापुढे एक क्षणही वाया न दवडता तू देवाशी आता संधान बांध आणि शक्य तितक्या लवकर त्याला स्वतःचा सखा करून घे, किंबहुना त्याला तुझा सोयराच करून घेऊन मिळालेल्या या संधीचे तू आता सोने करावेस अशी माझी तुला विनंती आहे...


किंबहुना ह्या जन्मात तरी तू तुझा खरा स्वार्थ साधून घे आणि तो म्हणजे स्वहिताचा स्वार्थ आणि अनर्थ घडवून आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तू संपूर्ण त्याग कर किंबहुना त्याच्याकडे पाठच फिरव... 


तसेच यापुढे तरी  भ्रमाची, कल्पनेची वाट सोडून देऊन तू सरळ आणि नीट असलेला आणि तुझ्या हिताकडे घेऊन जाणारा पंढरीचा मार्ग धर... 


आणि तेथे जाऊन विटेवर उभे असलेले श्री हरिचे गोजिरे रूप पहा आणि त्याद्वारे खऱ्या अर्थाने सर्व सुख पदरी पाडून घे... 


तुकोबाराय शेवटी म्हणतात तुम्ही जर आम्हांला विचाराल तर स्वतःचे दोन्ही चरण जोडून विटेवर नीट आणि व्यवस्थितपणे उभा असलेला श्री हरि विठ्ठल म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा कंदच आहे आणि त्याचा नामघोष करणे हा तर आम्हां वैष्णवांचा छंदच असून त्यामुळेच आम्हांला खरे सुख आणि समाधान प्राप्त होते..


🌻🌿🌻🌿


बहुतां जन्मां अंती जन्मलासी नरा । देव तू सोयरा करी आता ।।


करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडी आता ।।


सांडी आता कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ।।


पंढरीस जावे सर्व सुख घ्यावे । रूप ते पाहावे विटेवरी ।।


विटेवरी नीट आनंदाचा कंद । तुका म्हणे छंदे नामघोषे ।।


🌻🌿🌻🌿


अभंग ३२६१ 


क्रमशः

Comments

Popular posts from this blog